कोपरगाव : येसगाव हे विकासासह सर्वच बाबतीत कोपरगाव तालुक्यात आदर्श गाव असून, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त गाव म्हणून येसगाव संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते येसगावला आदर्श गाव म्हणून प्रथम पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. केवळ विकासाच्या बाबतीत नव्हे तर धार्मिक व इतर क्षेत्रातही येसगाव यापुढेही नेहमी अग्रेसर रहावे. यासाठी जी काही मदत लागेल ती कोल्हे परिवार व संजीवनी उद्योग समुहाकडून दिली जाईल, अशी ग्वाही सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, युवा नेते विवेक कोल्हे यांनी दिली.
कोपरगाव तालुक्यातील येसगाव येथे ओम श्री साई ग्रुपने आयोजित केलेल्या श्री साई सच्चरित्र महापारायण व संगीतमय साई कथामृत सोहळ्याची मंगळवारी (९ मे) श्रीक्षेत्र सराला बेटाचे मठाधिपती प. पू. ह.भ.प. रामगिरीजी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने भक्तिमय व मंगलमय वातावरणात सांगता झाली. विवेक कोल्हे यांनी या सोहळ्यास उपस्थित राहून प. पू. ह.भ.प. रामगिरीजी महाराज यांचे आशीर्वाद घेऊन त्यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा लाभ घेतला. येसगाव येथे दरवर्षी श्री साई सच्चरित्र महापारायण व संगीतमय साई कथामृत सोहळ्याचे आयोजन केले जाते. यंदा या सोहळ्याचे १२ वे वर्ष आहे. या सप्ताहात ह.भ.प. अरुण महाराज रोहोम कारवाडीकर यांच्या सुमधुर वाणीतून श्री साई संगीतमय कथा श्रवणाचा लाभ भाविकांनी घेतला. मंगळवारी सांगता सोहळ्यानिमित्त अवतरणिका ग्रंथ वाचन, पालखी मिरवणूक, महाप्रसादाचा कार्यक्रम झाला.
विवेक कोल्हे म्हणाले, श्रीक्षेत्र सराला बेटाशी व तेथील सद्गुरू श्री गंगागिरी महाराज संस्थानशी माजी मंत्री सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हेसाहेबांपासून कोल्हे परिवाराचे गेल्या अनेक वर्षांपासून निकटचे संबंध आहेत. अध्यात्मासह व्यसनमुक्ती, बंधुता, देशप्रेम, महिला सशक्तीकरण या कार्यासाठी प्रोत्साहन देण्याचे तसेच योग्य परंपरांचे जतन करीत अनिष्ट रुढींची अनावश्यकता लोकांना समजावून सांगण्याचे काम श्रीक्षेत्र सराला बेटाच्या माध्यमातून अखंड सुरू आहे. श्रीक्षेत्र सराला बेटाचे मठाधिपती प. पू. ह.भ.प. रामगिरीजी महाराज हे ब्र. योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज व ब्र. सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज यांच्या कार्याची परंपरा आजही उत्तमप्रकारे अव्याहतपणे पुढे चालवत आहेत. कीर्तन, प्रवचनाच्या माध्यमातून ते समाजप्रबोधनाचे फार मोठे सत्कार्य करत आहेत. त्यांच्यामुळे माझ्यासारखे असंख्य तरुण परमार्थाच्या मार्गाकडे वळले आहेत. प. पू. महंत रामगिरीजी महाराजांनी अनेक तरुणांना अध्यात्माची, परमार्थाची गोडी लावली आहे. त्यामुळे युवा वर्गामध्ये मोठा बदल घडल्याचे दिसून येत आहे. त्याबद्दल विवेकभैय्या कोल्हे यांनी ह.भ.प. रामगिरीजी महाराजांचे आभार मानले.
येसगाव व परिसरातील नागरिकांना अध्यात्माची आवड असून, येसगावमध्ये सतत धार्मिक कार्यक्रम होत असतात. ह.भ.प. रामगिरीजी महाराजांनी आपला आशीर्वाद सतत येसगावकरांच्या पाठीशी राहू द्यावा, अशी अपेक्षा विवेक कोल्हे यांनी व्यक्त केली. धार्मिक कार्याला स्व. शंकरराव कोल्हेसाहेबांचे नेहमीच सहकार्य लाभले. त्यांची ही परंपरा यापुढेही कायम ठेवून कोल्हे परिवार व संजीवनी उद्योग समुहाच्या वतीने धार्मिक कार्यक्रमांना कायम सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
याप्रसंगी कोपरगाव तालुक्याचे सुपुत्र धनंजयराव जाधव यांची शिवसेना (एकनाथ शिंदे गट) प्रणित शेतकरी सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल येसगाव ग्रामस्थांतर्फे त्यांचा ह.भ.प. रामगिरीजी महाराजांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ह.भ.प. अरुण महाराज रोहोम कारवाडीकर, आयोजक ओम श्री साई ग्रुप, श्री विठ्ठल भजनी मंडळ, श्री छत्रपती प्रतिष्ठान, श्री शंभू प्रतिष्ठान, श्री जाणता राजा प्रतिष्ठान, श्री रोकडोबा महाराज मित्रमंडळ, श्री सप्तशृंगी तरुण मंडळ, श्री शिवगर्जना तरुण मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, भजनी, टाळकरी मंडळी, येसगाव व पंचक्रोशीतील ग्रामस्थ तसेच भाविक-भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.