कोपरगाव – सोमवार (दि.०३) रोजी माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त आ. आशुतोष काळे यांच्या संकल्पनेतून ‘महाराष्ट्राचा हास्य कल्लोळ’ कार्यक्रम आयोजित केला असून या कार्यक्रमासाठी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ हा कार्यक्रम मराठी प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला आहे. या कार्यक्रमातील कलाकारांचा ‘महाराष्ट्राचा हास्यकल्लोळ’ हा आगळा वेगळा कार्यक्रम कोपरगावच्या तहसील कार्यालयाच्या मैदानावर आज सोमवार रोजी सायंकाळी होत आहे.
या कार्यक्रमासाठी सुप्रसिद्ध विनोदी कलाकार समीर चौगुले, चेतना भट, प्रसाद खांडेकर, नम्रता आवटे /संबेराव, वनिता खरात, रोहित माने यांच्या समवेत सुप्रसिद्ध गायक अंजली गायकवाड, चैतन्य देवरे, रील स्टार, सिने अभिनेत्री प्रसिद्ध नृत्यांगना माधुरी पवार आदी दिग्गज कलाकार आपले कलाविष्कार सादर करून प्रेक्षकांना पोट धरून हसवणार आहे.
चित्रपटात तसेच छोट्या पडद्यावर दिसणाऱ्या कलाकारांचे अभिनय जवळून पाहण्याची संधी प्रेक्षकांना कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाकडून उपलब्ध करून दिली आहे. यापूर्वीही ‘चला हवा येवू द्या’ या कार्यक्रमातील कलाकारांचा ‘चला हवा होवू द्या’ हा कार्यक्रम कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाने २०१८ साली याच तहसील कार्यालयाच्या मैदानावर आयोजित केला होता. त्यावेळी देखील जवळपास ४० ते ४५ हजार प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली होती. यावेळी देखील प्रेक्षकांची मोठी गर्दी होणार आहे.
माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांची ६ एप्रिल रोजी १०२ वी जयंती असून जयंतीनिमित्त गुरुवार ६ एप्रिल रोजी सकाळी ९.०० वाजता कारखाना कार्यस्थळावरील कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करण्यात येणार आहे. तसेच सकाळी ११.०० वाजता पंचायत समितीच्या प्रांगणातील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी व ‘महाराष्ट्राचा हास्यकल्लोळ” या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवन व उपाध्यक्ष नारायण मांजरे यांनी केले आहे.