कोपरगाव – सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. ते म्हणाले, शिंदे-फडणवीस सरकारने आपल्या पहिल्यावहिल्या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीय, शेतकरी, सामान्य नागरिक, महिला, कामगार, विद्यार्थी, उद्योजक, अंगणवाडी सेविकांसाठी अनेक योजना जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्राला प्रगतीकडे नेणारा हा अर्थसंकल्प आहे.
पायाभूत सुविधा, कृषी, पर्यावरण, पर्यटन विकासावर भर देणाऱ्या या अर्थसंकल्पाला ‘ग्रोथ बजेट’ तसेच ‘ग्रीन बजेट’ म्हणता येईल. या अर्थसंकल्पामुळे कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या विकासाला गती मिळणार आहे. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पायाभूत सुविधांसाठी ५३ हजार ५८ कोटींची तरतूद केली आहे. तसेच रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्यासाठी भरीव निधीची तरतूद सरकारने केली आहे. हवाई वाहतुकीला प्रोत्साहन आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी सरकारने मोठे पाऊल उचलले असून, राज्यातील सहा विमानतळाचा विकास करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यामध्ये शिर्डी विमानतळावर नवे प्रवासी टर्मिनल उभारण्यासाठी ५२७ कोटी, छत्रपती संभाजीनगर विमानतळ भूसंपादनासाठी ७३४ कोटी रुपये देण्यात येणार आहेत.
ते म्हणाले, सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत वैद्यकीय उपचार घेण्यासाठी असलेल्या महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. आतापर्यंत महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेचा लाभ घेऊन नागरिकांना १.५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळत होते. ही मर्यादा आता ५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. नव्या २०० रुग्णालयांचा यात समावेश होणार आहे. मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियांच्या दरात अडीच लाख रुपयांवरून ४ लाख इतकी वाढ करण्यात आली आहे. या निर्णयामुळे सरकारी रुग्णालयांवर अवलंबून असणाऱ्या गरीब लोकांना मोठा लाभ मिळणार आहे.
पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये ५ हजारांची वाढ करण्यात आली असून, सरकारी शाळांमध्ये आठवीपर्यंतच्या सर्व वर्गातील विद्यार्थ्यांना आता गणवेश मोफत मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे हे ३५० वे वर्ष आहे. या महोत्सवासाठी ३५० कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. पुण्यातील आंबेगाव (ता. हवेली) येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यानास ५० कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. तसेच मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथे शिवचरित्रावरील उद्यानांची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी २५० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या जीवनचरित्रावर संग्रहालय उभारले जाणार आहे. त्याचबरोबर शिवकालीन गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी ३०० कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. शिवकालीन ऐतिहासिक ठेवा जतन करण्याच्या दृष्टीने सरकारचा हा निर्णय महत्त्वाचा आहे, असे विवेकभैय्या कोल्हे यांनी सांगितले.
महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणाऱ्या समृद्धी महामार्गाचा आता दुसऱ्या टप्प्यात विस्तार होणार आहे. सिंदखेडराजा नोड ते शेगावपर्यंत चौपदरी रस्ता बांधण्यात येईल. शक्तिपीठ महामार्गामुळे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या माहूर, तुळजापूर, अंबाजोगाई ही तीन शक्तिपीठे जोडली जाणार आहेत. त्याचबरोबर औंढा नागनाथ, परळी वैजनाथ ही दोन ज्योर्तिलिंग, नांदेड गुरुद्वारा, पंढरपूर, कारंजा लाड, अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर ही तीर्थस्थळेदेखील जोडले जाणार आहेत.