कोपरगाव प्रतिनिधी दि. ११.०२.२०२३ रोजी भारतीय डाक विभागाद्वारा राष्ट्रीय पातळीवर AMRITPEX Plus program आयोजित केलेला आहे. त्याचा एक भाग म्हणून सर्व पात्र मुलींचे सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडण्यासाठी दि. १०.०२.२०२३ रोजी पोस्ट ऑफिसमध्ये विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.
भारतीय डाक विभाग ‘डाक सेवा, जन सेवा या ब्रीदवाक्याच्या उक्तीप्रमाणे, नेहमीच नागरिकांना आर्थिक सामावेशानाकरिता, सुरक्षित व विश्वासार्ह सेवा देण्याबाबत बांधील आहे. सुकन्या समृद्धी योजना हि केंद्र शासनाद्वारे खास मुलींच्या भविष्यासाठी चालू केलेली एक अल्प बचत योजना आहे.
त्याची सुरुवात सन २०१५ मध्ये ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ मोहिमेचा भाग म्हणून केली गेली. सदर योजनेमध्ये खाते उघडल्यास चक्रवाढ पद्धतीने आकर्षक व्याज खात्यावर दिले जाते. त्यामुळे मुलीच्या उच्च शिक्षणासाठी आणि लग्नासाठी या योजनेद्वारे मोठी रक्कम उभी केली जाऊ शकते. या योजनेचा सध्याचा व्याजदर ७.६% इतका आहे.
या योजनेत ● ते १० वर्ष वयाच्या मुलीचे खाते आई किंवा वडिलांद्वारे कमीत कमी रु. २५०/- नी उघडता येते. सदर खात्याची मुदत २१ वर्षे असून त्यात १५ वर्षे पैसे भरता येतात. मुलीच्या उच्च शिक्षणासाठी खात्यातून रक्कम काढण्याची व लग्नासाठी खाते बंद करण्याची सोय देण्यात आलेली आहे.
भारत सरकारच्या या अमृतप्लेक्स या उपक्रमाचे औचित्य साधून, आपणास विनंती करण्यात येते की, मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी असणाऱ्या या योजनेमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे आणि दि.. ०९.०२.२०२३ आणि १०.०२.२०२३ रोजी पात्र मुलींचे सुकन्या समृद्धी खाते आपल्या नजीकच्या पोस्ट ऑफिसमध्ये उघडावे.
या योजनेचा फायदा आपल्या घरातील पात्र मुलींसाठी घेऊन त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच तरतूद करावी. योजनेच्या सविस्तर माहितीसाठी नजीकच्या पोस्ट ऑफीसशी संपर्क साधावा असे आवाहन श्रीरामपूर डाक विभागाचे डाक अधिक्षक हेमंत खड्केकर तसेच शिर्डी पोस्ट ऑफिस कार्यालयाचे पोस्ट मास्तर राजेश नेतनकर यांनी केले आहे.