मुले पळवणाऱ्या टोळीची अफवा:नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, पोलिसांचे आवाहन
कोपरगाव – सध्या व्हाट्सअप वर सर्वत्र शालेय मुले पळविणारी टोळी आली असल्याची अफवा पसल्यामुळे पालकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे शाळा, इतर क्लासेससाठी मुलांना सोडविताना पालकांनी चिंता व्यक्त केली आहे. मात्र, नागरिकांनी अफवांना बळी न पडण्याचे आवाहन कोपरगाव ग्रामीण पोलिसांनी केले आहे.
सोशल मीडियावरील अफवा आणि व्हायरल झालेले फोटो पाहून काळजी न करण्याचेही सूचित केले आहे. त्याशिवाय मुलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांसह पालकांनीही योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन केले. शालेय विद्याथ्र्यांनी पळवून नेणाऱ्या टोळी आल्याची अफवा सोशल मीडियावर पसरल्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.त्यामुळे शाळा प्रशासन, कुटूंब, नातेवाईकांकडून खबरदारी घेतली जात आहे. मात्र, अशाप्रकारे कोणतीही घटना घडली नसून नागरिकांनी काळजी करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. विशेषतः मागील दोन दिवसांपासून सोशल मीडियावर काही विद्याथ्र्यांचे फोटो व्हायरल केले जात आहे.अमुक-तमूक शाळेतून मुलगा पळविला, मुलाचे अपहरण, अशाप्रकारे अफवांचे पीक जोमात आहे. त्याशिवाय काही शालेय प्रशासनानेही यापाश्र्वभूमीवर खबरदारी घेण्याचे सांगितले आहे. त्यामुळे मुलांना शाळेतून घरी नेण्यासाठी पालकांनी स्वतः हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
अफवांवर विश्वास ठेउ नका मुलांना पळवून नेणाऱ्या टोळीचे सोशल मीडियावर अफवांचे पीक आले आहे. अनेकांकडून ग्रु्रपवरील मेसेज खात्री न करता फॉरवर्ड केले जात आहेत. त्यामुळे अफवा वाढीस लागल्या आहेत. दरम्यान, नागरिकांनी अफवेचा कोणताही फोटो सोशल मीडियावर व्हायरल करू नये. मुलांना पळविणाऱ्या टोळीबाबत चिंता करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच, संशयास्पद व्यक्तींसदर्भात जवळच्या पोलिस ठाण्यांना माहिती द्यावी.