आ. आशुतोष काळेंच्या प्रयत्नातून घोयेगावला बससेवा सुरु,
नागरिकांनी मानले आ. आशुतोष काळेंचे आभार
कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील घोयेगाव गावातील ग्रामस्थांची मागील अनेक वर्षापासूनची बस सेवेची मागणी आ. आशुतोष काळे यांनी पूर्ण केली असून बससेवा सुरु झाल्यामुळे घोयेगाव व परिसरातील नागरिकांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव वैजापूर तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या घोयेगाव गावात बससेवा नसल्यामुळे विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक तसेच रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. यापूर्वी घोयेगाव ग्रामस्थांना या लालपरीला गाठण्यासाठी गोधेगाव किंवा नागपूर हाय वे वर दोन ते तीन किलोमीटर पायी यावे लागत होते. त्यामुळे घोयेगाव ग्रामस्थांनी आ. आशुतोष काळे यांच्याकडे बससेवा सुरु करण्याची आग्रही मागणी करून येत असलेल्या अडचणी मांडल्या होत्या.
त्याबाबत नागरिकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेवून आ. आशुतोष काळे यांनी परिवहन विभागाशी चर्चा करून घोयेगावला बस सेवा सुरु करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्या सूचनेप्रमाणे शुक्रवार (दि.१६) पासून कोपरगाव-गोधेगाव-घोयेगाव-तळेगाव मार्गे कोपरगाव अशी बससेवा सुरु झाली आहे.
यावेळी सरपंच कचरू भाटे, तळेगावचे सरपंच सचिन क्षिरसागर, सुदाम माने, राजेंद्र माने रविंद्र भानगुडे, रमेश बारहाते, राजधर भागवत, अण्णासाहेब गव्हाळे, बबनराव गायकवाड, नारायण कासार, साहेबराव भानगुडे, ज्ञानेश्वर बारहाते, सुलतान शेख आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
घोयेगावात लालपरीचे आगमन होताच ग्रामस्थांनी फटाके फोडून स्वागत केले. सुवासिनींच्या हस्ते विधिवत पूजन करून बसचे चालक व वाहक यांचा सत्कार केला. मागील अनेक वर्षापासुनचा बस सेवेचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे उपस्थित नागरिकांनी यावेळी आ. आशुतोष काळे यांचे जाहीर आभार देखील मानले.