पिढी घडविण्यासाठी छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराज चरित्र वाचावे- प्रा. अरुण घोडके
कोपरगांव :- इतिहासाचा ठेवा कधीही बदलत नाही तो संस्काराचा ठेवा आहे, तेंव्हा पिढी घडविण्यासाठी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी आणि धर्मवीर संभाजी महाराजांचे चरित्र जरूर वाचावे. क्रांतीकारकांचा इतिहास तरुणाईसाठी प्रेरणा देणारा आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक व संभाजी महाराज चरित्रकार प्रा. अरूण बाबुराव घोडके यांनी केले.
तालुक्यातील शिंगणापुर येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर गणेशाची प्रतिष्ठापना करण्यांत आली असुन सालाबादप्रमाणे याही वर्षी संजीवनी सांस्कृतिक मंडळाच्यावतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले. त्यातील सहावे पुष्प गुंफतांना इस्लामपुर सांगली येथील ज्येष्ठ इतिहासकार प्रा. अरूण घोडके बोलत होते.
प्रारंभी कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांनी प्रास्तविक करून माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या आठवणींना उजाळा दिला. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे व भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या योगदानाची माहिती देवुन ज्येष्ठ इतिहासकार प्रा. अरूण घोडके यांचा सत्कार केला. साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कामगार नेते मनोहर शिंदे यांनी उपस्थित कर्मचा-यांनी कामावरील निष्ठा जपणे आवश्यक असल्याचे सांगितले.
प्रा. अरूण घोडके पुढे म्हणाले की, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना तोरणा, दुर्गाडी आणि प्रचिती गडावर गुप्तधनाच्या तीन घागरी सापडल्या होत्या मात्र त्यांनी त्या आपल्या प्रजेला सुखी करण्यासाठी खर्च केल्या., तद्ववत माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी कोपरगांव विधानसभा मतदार संघाला आपल्या कामातुन जो परिसस्पर्श केलेला आहे तो कदापीही विसरता येणार नाही. त्यांची किर्ती अजरामर आहे.
धर्मवीर संभाजी महाराजांनी जेव्हढ्या लढाया लढल्या त्यात प्रत्येकवेळी यश मिळाले. ते संयमी, शुरवीर, धर्माचे संरक्षणकर्ते, स्वाभीमानी, लढवय्ये होते. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर त्यांनी स्वराज्याचे रक्षण केले. इतिहासाची प्रत्येक साक्ष आज तुम्हा आम्हाला खुणावते आहे. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांनी जे गड कोट किल्ले घेतले होते त्या स्थळावर एकदातरी प्रत्येक भारतीयाने जाउन त्याचा लेखाजोखा घेऊन तो पुढच्या पिढीला सांगावा, प्रत्येक सनावळीसह इतिहासाचे असंख्य दाखले प्रा. अरुण घोडके यांनी यावेळी दिले. गेल्या आठ वर्षापासून प्रा. अरूण घोडके हे समाजमाध्यमातुन २२ देशात शिवचरित्राचा जागर करतात त्यांच्या पहाडी आवाजाचे लाखो चाहते असुन ते दररोज शिवचरित्राचे श्रवण करतात.
याप्रसंगी मुख्य रसायनतज्ञ विवेककुमार शुक्ला, मुख्य अभियंता के. के. शाक्य, रासायनिक विभागाचे टी. व्ही. देवकर, मुख्य लेखाधिकारी एस. एन. पवार, एच आर मॅनेजर प्रदीप गुरव, उपमुख्य लेखाधिकारी प्रविण टेमगर, यांच्यासह सर्व खाते प्रमुख, उप खातेप्रमुख, कामगार, महिला, गणेशभक्त मोठया संख्येने उपस्थित होते. शेवटी व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे यांनी आभार मानले.