अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याने कहर केला असून, ब्रिजलाल नगर, कर्मवीर नगर, सुभाष नगर, समता नगर, रिद्धी सिद्धी नगर या भागात बिबट्याचे दर्शन झाले होते. हे दोन बिबटे असून आता हे बिबटे आज समतानगर, पाण्याची टाकी परिसरात परिसरात आढळून आले आहे. सदर बिबट्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी वन विभागाकडे एका प्रसिद्धी पत्रकान्वये केली आहे.
यात मंगेश पाटील म्हणाले आहे की, कोपरगाव शहरात बिबट्याची दहशत पसरली असून शाळेत जाणारे मुलं मुली यांचे आई वडील मोठ्या प्रमाणात धास्तावलेले असून सकाळी फिरायला जाणारे लोक, रात्री उशीरा कामावरून जाणारे नागरिक घाबरत आहेत.
कोपरगाव वनविभागाकडे पुरेसे पिंजरे नाही , मनुष्यबळ नाही , भक्ष नाही , निधी नाही, वाहन नाही ही खेदाची बाब आहे. वन्यजीव याने हल्ला केला तर १० लाख रोख वारसांना देण्याचा शासन निर्णय झाला आहे असे कळते पण जीव गेल्यानंतर या रकमेचा काय उपयोग आहे.
गेल्या दोन दिवसापासून शहरात मोठ्या प्रमाणात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे .आतापर्यंत कुठली वाईट घटना घडली नाही. तरी वन्य अधिकारी यांनी तात्काळ पिंजऱ्याची व्यवस्था करावी व बिबट्याच्या बाबतीतली योग्य ती बातमी, ठावठिकाणा जनतेपुढं सांगावी व मार्गदर्शन करावे.लोक घाबरल्याने रात्रीचे जागरण करत आहे.
तरी तात्काळ या भीतीच्या वातावरणातून वन्य अधिकाऱ्यांनी बिबट्याच्या तावडीतून नागरिकांची सुटका करावी अशी मागणी मंगेश पाटील यांनी शेवटी केली आहे.