कोपरगांवः महानगर टाईम्सचे राजापुर (जि. रत्नागिरी) येथिल पत्रकार शशिकांत वारीशे हे सोमवार दि. ६ फेब्रुवारी, २०२३ रोजी कोदवली येथुन आपल्या दुचाकीने जात होते. यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या महेंद्रा थार गाडीने (एमएच ०८एएक्स ६१००) त्यांच्या गाडीला धडक दिली. अपघात इतका भीषण होता की शशिकांत वारिशे गंभीर जखमी होवुन त्यांचा उपचारा दरम्यान मंगळवार दि ७ फेब्रवारी, २०२३ रोजी मृत्यु झाला.
मात्र हा अपघात नसुन घातपात आहे हे उघडच आहे,या घटनेचा निषेध करण्यासाठी व या प्रकरणात सखोल चौकशी होवुन वारिशे यांच्या कुटूंबियांना न्याय मिळण्यासाठी कोपरगांव तालुका पत्रकार मराठी पत्रकार संघ व कोपरगाव मराठी पत्रकार परिषदच्या वतीने तसेच सर्व पत्रकारांच्या वतीने आज नायब तहसिलदार पी. डी. पवार यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी संघाचे अध्यक्ष प्रा. साहेबराव दवंगे, उपाध्यक्ष लक्ष्मण वावरे, मराठी पत्रकार परीषदेचे जिल्हा सचिव पत्रकार रोहित टेके, मनोज जोशी , शंकर दुपारगुडे, सोमनाथ सोनपसारे, राहुल देवरे, युसुफ रंगरेज, बिपीन गायकवाड, विनोद जवरे, मोबीन खान, संतोष जाधव, विजय कापसे, काकासाहेब खर्डे, रविंद्र जगताप, आदी उपस्थित होते.
निवेदनात पुढे म्हटले आहे की सभ्य आणि सुसंस्कृत महाराष्ट्रात भूमिका घेऊन पत्रकारीता करणाऱ्या पत्रकारांचा आवाज कायमचा बंद केला जातो, पत्रकारांवर हल्ले करून किंवा त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होताना दिसतोय. पत्रकार कायदा आहे,मात्र या कलमाखाली गुन्हे दाखल करायलाही टाळाटाळ केली जाते. त्यामुळे महाराष्ट्रात निर्धोकपणे काम करणे पत्रकारांना कठीण झाले आहे. या घटना सातत्यानं वाढत असल्याने पत्रकारांमध्ये भितीची भावना निर्माण होत आहे.
शशिकांतने ज्यांच्या विरोधात बातमी प्रसिध्द केली ते कार चालक ते पंढरीनाथ आंबेरकर होते. सकाळी पंढरीनाथ आंबेरकर यांच्या विरोधात बातमी लागते आणि त्याच व्यक्तीची कार वारिशे यांच्या गाडीला जोरदार धडक देते, त्यात वारिशे यांचा दुर्दैवी मृत्यु होतो हा केवळ योगायोग नसुन कट रचुन केलेला हा खुनच आहे. या घटनेचा आम्ही राज्यातील सर्व पत्रकार तीव्र शब्दात निषेध करीत आहोत.
तसेच आरोपीवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, या खटल्याची सुनावणी फास्ट ट्रक (जलदगती न्यालयामार्फत) कोर्टामार्फत व्हावी आणि राज्यात पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी, अशी आमची मागणी आहे.
राज्यातील पत्रकारांचा विविध पध्दतीने आवाज बंद करण्याचा होत असलेला प्रयत्न पुरोगामी महाराष्ट्राला शोभा देणारा नाही. वारंवार होणारे हल्ले, त्यांच्यावर दाखल केले जाणारे खोटे गुन्हे थांबले नाही तर राज्यातील पत्रकारांना उग्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा आम्ही निवेदनाच्या माध्यमातुन देत आहोत. राज्यात गेल्या आठ दिवसात पत्रकारांचा आवाज बंद करण्याचा किमान आठ घटना घडल्या आहेत.
हत्या झालेले पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या कुटूंबाला न्याय मिळावा अशी आमची विनंती आहे. तसेच राज्यात पत्रकारांना मुक्तपणे काम करण्यासारखे वातावरण तयार करण्याची सरकारची जबाबदारी आहे, त्यादृष्टीने भविष्यात प्रयत्न व्हावेत, अषी आमची विनंती आहे, असे निवेदनात शेवटी म्हटले आहे.