कोपरगाव – कोपरगाव तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून पहिल्या घटनेत कोपरगाव तालुक्यातील शिरसगाव शिवारात एक 29 वर्षीय तरुणाचा मृतदेह त्याच्या राहत्या घरात गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला आहे तर दुसऱ्या घटनेत तालुक्यातील टाकळी शिवारात 60 वर्षीय वृद्ध महिलेने त्यांच्या शेतातील विहिरीच्या पाण्यात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सदर घटनेने कोपरगाव तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव तालुक्यातील शिरसगाव शिवारात आज गुरुवार दिनांक 19 जानेवारी 2023 रोजी सकाळी नऊ वाजेच्या पूर्वी 29 वर्षीय योगेश कैलास जाधव या तरुणाचा मृतदेह त्याच्या राहत्या घरात छताला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला आहे.
सदर घटनेबाबत विलास सुखदेव जाधव वय 53 वर्ष रा. शिरसगाव ता. कोपरगांव यांनी तालुका पोलिसांना खबर दिली असता तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करत सदर मृतदेह अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी सी. आर. पी. सी 174 प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद केली असून सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक चंद्रकांत काळे हे करीत आहे.
तर दुसऱ्या घटनेत आज गुरुवार दिनांक 19 जानेवारी 2023 रोजी सकाळी सात वाजेच्या पूर्वी कोपरगाव तालुक्यातील सातचारी टाकळी येथील 60 वर्षीय जयमाला पथाजी देवकर यांनी त्यांच्या शेतात असलेल्या विहीरीच्या पाण्यात उडी मारुन आत्महत्त्या केली असल्याची माहिती शहर पोलिसांकडुन प्राप्त झाली आहे.
सदर घटनेची खबर संदीप श्रीपत देवकर वय 49 वर्षे रा सातचारी टाकळी ता. कोपरगाव यांनी शहर पोलिसांना दिली असता शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सदर मृतदेह पाण्याबाहेर काढत मृतदेहाचा पंचनामा करत सदर मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी पाठविण्यात आला होता.
सदर प्रकरणी शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी सीआरपीसी 174 प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
सदर महिलेने आत्महत्या का केली याचा तपास पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल डी आर तिकोने हे करीत आहे.