कोपरगाव : कोपरगाव विधानसभा मतदारसंघात गतवर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाने पंचनामे करून तीन महिने उलटले तरी अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. बाधित शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी केली आहे.
स्नेहलताताई कोल्हे म्हणाल्या की, सन २०२२ मध्ये जुलै ते सप्टेंबर या काळात कोपरगाव विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सोयाबीन, बाजरी, कापूस, मका, कांदा, भाजीपाला, फळपिके व इतर पिकांचे अतोनात नुकसान होऊन शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. त्यामुळे शेतकरीवर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. सलग चौथ्या वर्षी कोपरगाव तालुक्यासह मतदारसंघात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने तर अक्षरश: धुमाकूळ घातला. २० ऑक्टोबर २०२२ रोजी पहाटे कोपरगाव शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी ढगफुटी झाली. अतिवृष्टीमुळे नागरिकांच्या घरात पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले. शेतशिवारातील उभी पिके वाहून गेली.
ऑक्टोबर २०२२ मध्ये झालेल्या पावसाने शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे काढणीस आलेली पिके शेतातच सडून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनामार्फत नुकसान भरपाई देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने यापूर्वीच घेतला आहे. त्यानुसार सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना देण्यासाठी अनुदान मंजूर केलेले आहे.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे महसूल व कृषी विभागामार्फत पंचनामे करण्यात आले आहेत. पीक नुकसानीचा अहवाल प्रशासनाने शासनाकडे पाठविला आहे. शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून तीन महिने झाले तरी संबंधित शेतकऱ्यांना अजूनही शासनाने जाहीर केलेली मदत वाटप झालेली नाही.
अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे सध्या शेतकरी अडचणीत असून, अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना शासनाच्या धोरणाप्रमाणे लवकरत लवकर नुकसान भरपाई मिळाल्यास त्यांची आर्थिक अडचण दूर होण्यास मदत होईल.
त्यामुळे प्रशासनाने नुकसान भरपाईची रक्कम बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर ताबडतोब जमा करावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी स्नेहलताताई कोल्हे यांनी केली आहे.
अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी; स्नेहलताताई कोल्हे यांची मागणी
Leave a comment