कोपरगाव – कोपरगाव तालुक्यातील तळेगाव येथे वडील आपल्या मुलाला दुचाकी वरून घरी घेऊन जात असताना या दोघांवर अचानकपने बिबट्याने काल गुरुवार दि. 25 ऑगस्ट रोजी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास हल्ला केला आहे. या बिबट्याच्या हल्ल्यात वडील व मुलाच्या पोटाला व हाताला गंभीर जखमा झाल्या आहे. सदर घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली असून पंचक्रोशीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की , कोपरगाव तालुक्यातील तळेगाव मळे येथील रहिवासी संदिप विषणुपंत क्षिरसागर व त्यांचा मुलगा साई संदिप क्षिरसागर हे दोघे धोत्रे येथून आपल्या राहत्या घरी तळेगाव येथे आपल्या दुचाकी वरून परतत असताना गावच्या जवळच असणाऱ्या टुपके वस्ती नजीक बिबट्याने केलेल्या हल्ल्यात हे दोघे जखमी झाले आहे. बिबट्याच्या हल्ल्यात ते सुदैवाने बचावले असून त्यांनी दहेगाव येथील खाजगी दवाखान्यात प्राथमिक उपचार घेतले आहे.
दरम्यान तळेगावमळे परिसरात अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर असून याबाबत येथील नागरिकांनी वारंवार वनविभागाकडे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती.मात्र तो बिबट्या एखाद्या मनुष्याला इजा करत नाही तो पर्यंत पिंजरा लावता येत नाही किंवा काही करता येत नाही असे सांगन्यात आल्याचे नागरीकांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे. वनविभागाने याकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. एखाद्याचा जीव गेल्यावर वन विभाग त्या बिबट्याचा बंदोबस्त करणार का ? असा संतप्त सवाल ही ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
सदर घटनेने तळेगाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. आता वन विभाग पिंजरा लावते का बघ्याची भूमिका घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.