अहमदनगर: शिवसेनेला पडलेल्या खिंडारानंतर आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रा काढली आहे. या यात्रेत आदित्य ठाकरे यांनी शिर्डीतील जनतेशी संवाद साधला. शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे हे शिंदे गटात सामिल झाल्याने शिवसैनिकांनी शिवसंवाद मेळाव्याप्रसंगी लोखंडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आदित्य ठाकरे यांच्या भाषणादरम्यान शिवसेनेचे माजी मंत्री बबनराव घोलप यांची मेळाव्या स्थळी एंट्री झाली. त्यावेळी शिवसैनिकांनी ‘भावी खासदार’ असा उल्लेख करत जोरदार घोषणाबाजी केली.
आदित्य ठाकरे यांनीही कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीचं समर्थन केलं. आदित्य ठाकरे यांनी बबनराव घोलप यांचा हातात हात घेताच शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. मात्र लगेच उमेदवारी देणे माझ्या हातात नाही असं आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
साईबाबांनी माझी वाट मोकळी करून दिली आहे. पक्षाचा आदेश आल्यास तो मानून जे पुढे मला कर्तव्य करायच ते मी करेल. मी बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक असून 54 वर्ष शिवसेनेत आहे. आदेश पाळणे माझा धर्म असून मला जे काम मिळेल ते मी करत राहील अशी प्रतिक्रीया माजी मंत्री बबनराव घोलप यांनी दिली आहे.
2014 साली बबनराव घोलप यांची शिवसेनेकडून शिर्डी लोकसभा मतदारसंघात उमेदवारी निश्चित झाली होती. मात्र निवडणुकीच्या काही दिवस अगोदर न्यायालयीन अडचणीमुळे घोलप यांना निवडणूक लढवता आली नाही. त्यामुळे ऐनवेळी भाजपाचे सदाशिव लोखंडे यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आणि अवघ्या काही दिवसात सदाशिव लोखंडे कोणताही जनसंपर्क नसताना खासदार झाले. यामुळे आता बबनराव घोलप हे आगामी उमेदवार असण्याची शक्यता नाकारता येत नाही.