कोपरगाव : ऐन उन्हाळ्यात महावितरणचा भोंगळा कारभार कोपरगाव शहरात पहावयास मिळत असुन मेंट्नसच्या नावाखाली शहरातील अनेक भागातील वीज पुरवठा दररोज कोणतीही पुर्व सूचना न देता खंडित करत असल्याने नागरिक, दुकानदार व्यापारी अक्षरशः वैतागले आहे.
आज सोमवार दिनांक 15 मे रोजी ऐन आठवडे बाजाराच्या दिवशी शहराचे तापमान 40 डिग्री पर्यत गेलेला असताना महावितरण कडुन तब्बल दोन तास वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. महावितरणच्या या भोंगळ्या कारभार व मनमानी कारभारा विरोधात शहरातील मनसे तालुका अध्यक्ष अनिल गायकवाड, शिवसेना ठाकरे गटाचे भरत मोरे व मनसे दिव्यांग सेनेचे जिल्हा अध्यक्ष योगेश गंगावल यांनी आवज उठवत महावितरणच्या कार्यालयाच्या दालनाबाहेर उन्हात दीड तास ठिय्या आंदोलन करत महावितरण अधिकारी, कर्मचारी यांना धारेवर धरले होते.
जोपर्यंत शहराचा वीज पुरवठा सुरळीत केला जात नाही तो पर्यंत महावितरनच्या दालनाबाहेरून उठणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर व यापुढे हा भोंगळा व मनमानी कारभार खपवून घेतला जाणार नाही असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिल्या नंतर महावितरणला खडबडून जाग येत तसेच सदर आंदोलनाचा धसका घेत महावितरणने जलद गतीने शहराचा वीज पुरवठा सुरळीत केला आहे. पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थी व महावितरणच्या विनंती नंतर सदर आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
महावितरणने वीज पुरवठा खंडीत करताना पूर्व सूचना द्यावी तसेच ऐन उन्हाळ्यात वीज पुरवठा खंडित करू नये अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. वारंवार वीज पुरवठा खंडित करून नागरिकांचा अंत पाहू नये अन्यथा यापुढे आज सारखे अहिंसाच्या मार्गाने आंदोलन न होता तीव्र आंदोलन होऊन नागरिकांच्या तीव्र रोषाला महावितरणला सामोरे जावे लागेल , आज बल्प फोडले , यानंतर काय फुटेल सांगू शकत नाही असा असा इशारा मनसे चे तालुकाध्यक्ष अनिल गायकवाड व आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला आहे.
या निमित्ताने महावितरण दर शनिवारी दुरुस्तीच्या नावाखाली दिवसभर वीज पुरवठा खंडित करत ते फक्त नावालाच का असा प्रश्न उपस्थित झाला असुन सदर आंदोलनामुळेच महावितरणने इतकी तत्पुरता दाखवत वीज पुरवठा सुरळीत केला का मात्र जर आंदोलन केलेच नसते तर नागरिकांना ऐन उन्हाळ्यात घरात, दुकानात उन्हाचे चटके खावे लागले असते का हा ही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो.
महावितरण आणि समस्या हे कोपरगाव शहरासाठी एक समीकरण बनले आहे. यापुढे कायम खंडित होणारा वीज पुरवठा यापुढे कायम सुरळीत राहणार का की नव्याचे नउ दिवस अशीच परिस्थिती कायम राहणार हा येणार काळच सांगेल.
यावेळी महावितरणचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोबरे, पोलीस कॉन्स्टेबल राम खारतोडे, सुनील फंड उपस्थित होते.