समता पतसंस्था व बँकांच्या कामकाजात आता काहीच फरक राहिला नाही – काका कोयटे, चेअरमन
कोपरगाव : समता पतसंस्थेचे कामकाज गेली अनेक वर्ष अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणाली द्वारे सुरू आहे. मोबाईल बँकिंग, व्हावचरलेस बँकिंग, पेपरलेस बँकिंग, फॉरेन्सिक ऑडिट कंट्रोल रूम, कॉल सेंटर या प्रणालीमुळे समता बँकिंग क्षेत्रात अग्रेसर आहे. त्या तंत्रज्ञानातील यु.पी.आय. प्रणालीच्या माध्यमातून क्यु.आर कोड द्वारा ही सेवा आधी इनकमिंग पद्धतीने सुरू होती. समताचा ३८ वा वर्धापनदिन व जागतिक तंत्रज्ञान दिवसाच्या निमित्ताने आता ही सेवा आउट गोइंग केल्यामुळे देखील समताचा क्यु.आर.कोड वापरणाऱ्या ग्राहकांना बँकेपेक्षा अधिक सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच राष्ट्रीयकृत, खाजगी बँकांपेक्षाही समताचे कामकाज सरस होणार असून ग्राहक, सभासदांना क्यु. कोड द्वारा कोणतेही शुल्क न आकारता इनकमिंग बरोबर आउट गोइंग सेवा देखील मिळणार असल्याचे समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी सांगितले.
समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या ३८ व्या वर्धापन दिनी झालेल्या वार्षिक सर्व साधारण सभेत सेल्फ बँकिंग प्रणालीचा शुभारंभ प्रमुख पाहुणे श्री.विजय नायडू आणि क्यु.आर. कोड आउट गोइंग सेवेचा शुभारंभ प्रमुख पाहुणे श्री.विजय नायडू, सभासद डॉ.नरेंद्र भट्टड, श्री. शाम जंगम यांच्या हस्ते करण्यात आला. त्या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख उपस्थितांचे स्वागत संचालक श्री. अरविंद पटेल यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, यु.पी.आय प्रणालीच्या माध्यमातून क्यु.आर कोड द्वारा राष्ट्रीयकृत, खाजगी बँकांचे व्यवहार मोठ्या प्रमाणात चालत आहे. दरवर्षी ७४०० कोटी ट्रांझक्शनच्या माध्यमातून भारतात दरवर्षी १४९ लाख कोटी रुपयांचे व्यवहार हे यु.पी.आय प्रणालीच्या माध्यमातून होत असतात, म्हणजे भारतात दररोज २६ कोटी ट्रांझक्शन यु.पी.आय प्रणाली मार्फत होतात. या प्रणालीशी परिपूर्ण पद्धतीने म्हणजे इनकमिंग व आउट गोइंग पद्धतीने जोडली जाणारी महाराष्ट्रातीलच नव्हे, तर भारतातील समता पतसंस्था ओळखली जाणार आहे. ही प्रणाली नेटविन सॉफ्टवेअर प्रा.लि. आणि आय.सी.आय.सी.आय बँक द्वारे स्कॅन अँड पे क्यु.आर.कोड इनकमिंग आणि आउट गोइंग या दोन्ही पद्धतीने सुरू केली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना संस्थेचे संचालक श्री.संदीप कोयटे म्हणाले की, भारतातील बँकिंग व्यवहारात ४० टक्के लोक या प्रणालीचा वापर करतात. परंतु अद्याप ६० टक्के लोक या प्रणालीशी जोडले गेलेले नाही. २०१६ साली या प्रणालीची ट्रांझक्शन संख्या केवळ ९३ हजार होती. हा वाढीचा वेग पाहता पुढील २ वर्षात दररोज किमान १०० कोटी ट्रांझक्शन यु.पी.आय द्वारे होतील असा अंदाज आहे.
या योजनेद्वारे ग्राहकांचे समताच्या खात्यात जमा असलेल्या रकमेच्या आधारे भारतात कुठेही पेमेंट करता येईल तसेच स्वीकारता येईल. अशा प्रकारची सेवा राष्ट्रीयकृत, खाजगी बँका देतात. परंतु त्या बँकांमध्ये खात्यावर जमा असलेल्या रकमेवर २ ते ३ टक्के व्याज दिले जाते. परंतु समता पतसंस्थेच्या ग्राहक, सभासदांना त्यांच्या जमा रकमेवर तब्बल ७ टक्के व्याज मिळणार आहे. तसेच या योजनेत सहभागी होणाऱ्या ग्राहक, सभासदांसाठी खास बक्षीसे ही देण्यात येणार आहे.या परिपूर्ण प्रणालीमुळे समताची ‘हर घर क्यु.आर.कोड’ योजना मोठया प्रमाणात राबविण्यात येणार आहे.
नेटविन सॉफ्टवेअर प्रा.लि.चे संचालक श्री.उत्तम घाडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अजित मेनन, मार्केटिंग अधिकारी श्री.मसूद अत्तार, आणि आय.सी.आय.सी.आय. बँकेचे रिजनल हेड श्री.शरद ढगे, श्री.जो जोसेफ आदी पदाधिकारी उपस्थित होते. मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की, समता पतसंस्था ग्राहक, सभासदांना यु.पी.आय.प्रणाली मार्फत क्यु.आर.कोड द्वारा इनकमिंग आणि आउट गोइंगचे तंत्रज्ञान वापरात आणणारी देशातील पहिली पतसंस्था आहे. एवढेच नव्हे, तर देशातल्या हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या सहकारी बँका सोडल्या, तर ही प्रणाली वापरात आणणारी समता पतसंस्था ही प्रथम क्रमांकाची पतसंस्था ठरली आहे. आमच्या सहभागातून ही योजना साकार होत आहे याचा आम्हाला आनंद होत आहे.
प्रसंगी संस्थेचे जनरल मॅनेजर श्री. सचिन भट्टड म्हणाले की, समताचे अत्याधुनिक तंत्रज्ञान, कामकाजाचे अवलोकन करण्यासाठी राज्यातून अनेक पतसंस्था भेट देत असतात. राज्यातील पतसंस्था चळवळ वाढावी. यासाठी समताला भेट देण्यासाठी आलेल्या पतसंस्थांना आम्ही मार्गदर्शन ही करीत असतो.संस्थेचा आय.टी.विभाग आणि नेटविन सॉफ्टवेअर प्रा.लि. यांनी वर्षभर या योजनेवर संशोधन करून ही परिपूर्ण योजना प्रत्यक्षात आणली आहे. यामुळे पतसंस्था चळवळ ही सुदृढ आणि सक्षम होणार आहे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.संजय पारखे यांनी केले. कार्यक्रमाला चेअरमन काका कोयटे, जेष्ठ संचालक श्री.गुलाबचंद अग्रवाल, श्री.अरविंद पटेल, श्री.जितूभाई शहा, श्री.चांगदेव शिरोडे, श्री.कांतीलाल जोशी, श्री. कचरू मोकळ,श्री.संदीप कोयटे, संचालिका सौ. शोभा अशोक दरक, तसेच संस्थेचे ग्राहक, सभासद, मुख्य कार्यालयातील अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.उपस्थितांचे आभार जनरल मॅनेजर श्री.सचिन भट्टड यांनी मानले.