भारताच्या नीरज चोपडाची भालाफेक मध्ये ऐतिहासिक कामगिरी – विवेक कोल्हे.
कोपरगांव (वार्ताहर) दि. २४ जुलै २०२२
युजीन येथील जागतिक मैदानी स्पर्धेत भारताच्या नीरज चोपडाने ८८.१३ मीटर भालाफेक करुन १९ वर्षानंतर या स्पर्धेत भारताला सिल्व्हर मेडल मिळवून दिले ही ऐतिहासिक कामगिरी असल्याचे सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी म्हटले आहे. संजीवनी उद्योग समूहाच्यावतीने त्याचे अभिनंदन करण्यात आले आहे.
ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेलो इंडिया अभियानाला सातत्याने प्रोत्साहन दिले त्यामाध्यमातून देशात सर्वत्र खेळाला विशेष महत्व प्राप्त होत असुन नीरज चोपडा सारखे खेळाडू भारताचे नाव जागतिक स्तरावर उज्वल करत आहे. या कामगिरीमुळे देशाची मान जगात उंचावली आहे.
पॅरीस येथील जागतीक मैदानी स्पर्धेत यापुर्वी भारताच्या अंजू बॉबी जॉर्ज होने २००३ मध्ये लांबउडीत कास्यपदक प्राप्त केले होते. तब्बल १९ वर्षानंतर हरियाणा पानीपतच्या नीरज चोपडाने या पदकावर आपला हक्क सिद्ध केला. त्याला प्रशिक्षक उबे हॉन (जर्मनी) आणि डॉ. क्लॉस बारटोनीझ यांचे मार्गदर्शन मिळाले. युजीनच्या जागतिक मैदानी स्पर्धेत भारताची कामगिरी सरस ठरली आणि २३ जुलै रविवार हा भारतासाठी सुवर्ण अक्षराने लिहीणारा ऐतिहासिक दिवस ठरला आहे.
खेळ आणि त्याचे सातत्य प्रत्येकाने टिकवावे व त्यातून ग्रामीण भागाबरोबरच आपला तालुका, जिल्हा, राज्य व देशाचे महत्व वाढवावे असेही विवेकभैय्या कोल्हे शेवटी म्हणाले. अन्य भारतीय खेळाडूंनी युजीन येथे केलेल्या कामगिरीबद्दल अभिनंदन केले आहे.