कोपरगाव – कोपरगाव शहरातील प्रभाग ५ मधील रस्त्याचे काम मागील तीन महिन्यापासून संथ गतीने सुरु असून त्यामुळे व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होत आहे. ठेकेदाराच्या मनमानीमुळे सोमवार (दि,१३) रोजी बाजारचा दिवस असूनही प्रभाग ५ मधील व्यावसायिकांना आपले व्यवसाय बंद ठेवावे लागले आहे. त्यामुळे व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून संबंधित ठेकेदाराची मनमानी बंद करून या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे अशी मागणी राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष धनंजय कहार यांनी केली आहे.
कोपरगाव शहरातील प्रभाग ५ मध्ये सुरु असलेल्या रस्त्याच्या कामामुळे मागील तीन महिन्यापासून रस्ता खोदून ठेवल्यामुळे व्यापाऱ्यांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागत असून त्यांचे व्यवसाय मंदावले आहेत. काही दिवसांपूर्वी रस्त्याचे थांबलेले काम पुन्हा कासवगतीने सुरु झाले.
मात्र या मनमानी ठेकेदाराने रस्त्यातच खडी/मातीचे मोठे ढिगारे टाकल्यामुळे रस्ता पूर्णपणे बंद झाला.त्यामुळे बाजारासाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या ग्राहकांना दुकानापर्यंत जाण्यासाठी रस्ताच राहिला नाही. त्यामुळे सोमवार असूनही प्रभाग ५ मधील व्यापाऱ्यांना आपले व्यवसाय बंद ठेवावे लागले. परिणामी संपूर्ण बाजारपेठ बंद राहिली व सराफ बाजाराकडे जाणारा रस्ता देखील बंद झाला होता त्यामुळे व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान या मनमानी ठेकेदारामुळे झाले आहे.
व्यापाऱ्यांचे होत असलेले आर्थिक नुकसान थांबविण्यासाठी नगरपरिषदेकडून तातडीने कार्यवाही होवून या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करून घेणे गरजेचे आहे. मार्च अखेरीच्या वसुलीसाठी नागरिकाकडून कर वसूल करण्यासाठी नगरपरिषदेचे अधिकारी नागरिकांच्या घरोघरी जात आहेत.
मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी खर्च करून रस्त्याचे काम सुरु असतांना नगरपरिषदेचा एकही अधिकारी याठिकाणी उपस्थित राहत नाही यावरून हे काम दर्जेदार होईल का? असा प्रश्न सर्वसामान्य शहरवासियांना पडला आहे. त्यामुळे सुरु असलेल्या कामाच्या ठिकाणी नगरपरिषदेच्या जबाबदार अधिकाऱ्याच्या उपस्थितीत ठेकेदाराकडून या रस्त्याचे दर्जेदार काम होईल याची कोपरगाव नगरपरिषदेने काळजी घ्यावी. व व्यावसायिकांची विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा बसविण्यासाठी या मनमानी ठेकेदाराकडून या रस्त्याचे काम लवकरात पूर्ण करून घ्यावे अशी मागणी धनंजय कहार यांनी केली आहे.