मराठी भाषेचे संवर्धन करणे हे आपले कर्तव्य – डाॅ. मनाली कोल्हे
संजीवनी इंटरनॅशनल स्कूल मध्ये मराठी राजभाषा दिन उत्सवात साजरा
कोपरगांव: मराठी भाषेला अधिकाधिक संपन्न करण्यासाठी व तिच्या समृद्धीसाठी ज्या साहित्यिक महात्म्यांनी आपले जीवन व्यतीत केले. त्यांच्याबद्दल आपण ऋणी असले पाहिजे, तसेच मराठी भाषेचे संवर्धन करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे, असे मत संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित शिर्डी येथिल संजीवनी इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका डॉ. मनाली अमित कोल्हे यांनी व्यक्त केले.
संजीवनी इंटरनॅशनल स्कूल मध्ये आज २७ फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा दिवस म्हणजेच मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डाॅ. कोल्हे बोलत होत्या.
२७ फेब्रुवारी हा दिवस म्हणजे प्रसिद्ध ज्येष्ठ लेखक, कवी, कादंबरीकार विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी दरवर्षी मराठी भाषा दिन म्हणजेच मराठी राजभाषा दिवस साजरा केला जातो.कुसुमाग्रज यांची जयंती तसेच मराठी राजभाषा दिवस याचे औचित्य साधून संजीवनी इंटरनॅशनल स्कूल शिर्डी शाळेत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
डाॅ. कोल्हे यांच्या हस्ते कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी या गीताने कार्यक्रमाची सुरवात झाली.यावेळी विद्यार्थ्यांनीही आपला सहभाग नोंदविला यात समन्वी शिंदे हिने कवी कुसुमाग्रज यांच्या कविता, कथा, नाटके, कादंबरी यांच्याविषयी माहिती सांगितली. पीहू मोटे हिने आपल्या भाषणात मराठी भाषेचा इतिहास, मराठी भाषेतील विविध महान ग्रंथ व कवी यांच्या बद्दल माहिती सांगितली आणि आपल्या दैनंदिन जीवनात मोठ्या प्रमाणात जास्तीत जास्त मराठी भाषेचा वापर करण्याचे आवाहन केले.
साईश देशमुख व स्वरूप गोंदकर यांनी कुसुमाग्रज यांच्या प्रसिद्ध असणाऱ्या कविता सादर केल्या. जयवीर भुजबळने पोवाडा सादर केला. आद्या काळे हिने ‘अमृताची गोडी तुझ्या अभंगात’ हा अभंग सादर केला. तसेच अद्वेद शिंदे याने नटसम्राट या मराठी चित्रपटातील नाना पाटेकर यांचा प्रसिध्द संवाद सादर केला.
डाॅ. कोल्हे पुढे म्हणाल्या की मराठी भाषा ही आपली माता आहे. प्रत्येकाने इतर भाषेतील साहित्याचा अभ्यास करता करता मराठी भाषेचा देखील अभ्यास केला पाहिजे आणि मराठी भाषेची किर्ति जगामध्ये दुरवर पसरविली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.
या आठवड्यात शाळेमध्ये मराठी भाषा या दिनानिमित्त इयत्ता पहिली ते चौथी या वर्गातील मुलांसाठी मराठी कविता गायन स्पर्धा घेण्यात आली होती. तसेच इयत्ता पाचवी ते आठवी या वर्गातील मुलांसाठी मराठी भाषेचे महत्व, मराठी साहित्यकांचे कार्य आणि शेतकरी जीवन या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेमध्ये सर्वोत्तम स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
सदर प्रसंगी शाळेच्या प्राचार्या सौ. सुधा सुब्रमण्यम, हेड मिस्ट्रेस माला मोरे तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष श्री नितीनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. आर्यन औताडे याने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
फोटो ओळी: