समता इंटरनॅशनल स्कूलचे माणिक समताचे नाव चहुबाजूंना चमकवतील – कार्यकारी विश्वस्त सौ.स्वाती कोयटे
कोपरगाव : समता इंटरनॅशनल स्कूलची इ. १० वी च्या २०२२ – २३ सफायर बॅच मधील सर्व विद्यार्थ्यांना ज्ञानाबरोबरच समताची शिस्त आणि संस्काराची शिदोरी दिली आहे. या शिदोरीचा उज्वल भविष्य घडविण्यासाठी उपयोग होणार आहे. ज्ञान, शिस्त, संस्कार या आधारे समताचे माणिक भविष्यात चमकतील आणि स्वतःबरोबर शाळेचे नाव ही चहूबाजूंना चमकवतील. असे प्रतिपादन शाळेच्या कार्यकारी विश्वस्त सौ. स्वाती संदीप कोयटे यांनी केले.
समता इंटरनॅशनल स्कूल मध्ये इ.१० वीच्या सफायर २०२२ – २३ बॅचचा निरोप समारंभ भावनिक वातावरणात संपन्न झाला. त्या प्रसंगी सफायर बॅचला मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
प्रसंगी सफायर बॅचमधील स्वरूपा दास व अथर्व बेरगळ भावनिक मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, आमच्यावर घरातील संस्काराबरोबरच समतातील ज्ञान, शिस्त, संस्कारामुळे आमच्या आयुष्याला एक नवीन कलाटणी मिळणार आहे.आम्हाला ज्ञानाची शिदोरी देण्यासाठी स्कूलचे संस्थापक काकाजी कोयटे, कार्यकारी विश्वस्त सौ.स्वाती कोयटे, मुख्य कार्यवाहक श्री.संदीप कोयटे, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन ही खुप मोलाचे आहे. आम्हाला मिळालेले ज्ञानाचे धडे हे न विसरण्यासारखे आहे. यांच्यामुळेच आज आम्ही वेगवेगळ्या परीक्षांमध्ये यश संपादन करून आमचं उज्वल भविष्य घडवणार आहोत.
समता इंटरनॅशनल स्कूलचे उपप्राचार्य श्री समीर अत्तार मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करताना म्हणाले की सफायर बॅचमधील विद्यार्थी हा ज्ञानातच नाही, तर कलेत ही निपुण आहे. त्यामुळे समताचे विद्यार्थी ज्या क्षेत्रात जातील, त्या क्षेत्रात स्वतःचे उज्वल भविष्य घडवतील. आमचे त्यांना आत्ताच नाही, तर यापुढेही मार्गदर्शन लाभेल.
या बॅचला निरोप देताना एक भावनिक वातावरण तयार झाले होते. या भावनिक वातावरणात कधीही न विसरणारे अनमोल क्षण विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात अनुभवले. या बॅच मधील विद्यार्थ्यांनी ज्ञान, कला, क्रीडा क्षेत्रात केलेल्या उज्वल कामगिरीबद्दल त्यांचा कार्यकारी विश्वस्त सौ.स्वाती कोयटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बॅच मधील विद्यार्थ्यांनी गीत व नृत्यातून समता इंटरनॅशनल स्कूल विषयीच्या भावना व्यक्त केल्या. उपस्थित शिक्षकांपैकी श्री.आकाश मिश्रा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत मनोगत व्यक्त केले.
निरोप समारंभाचे सुत्रसंचालन शिक्षिका सौ.शोभा गढरी यांनी केले. या कार्यक्रमाला प्राथमिक, माध्यमिक विभागातील विद्यार्थी त्यांचे पालक समता स्कूलचे शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.उपस्थितांचे आभार शिक्षिका सौ.रोहिणी वक्ते यांनी मानले.