मतदार संघातील आठ गावांचा पाणी प्रश्न मार्गी… पाणी पुरवठा योजनांना ६६ कोटी निधी मंजूर – ना. आशुतोष काळे
कोपरगाव – कोपरगाव मतदार संघातील महिला भगिनींच्या डोक्यावर हंडा ही नित्याचीच बाब झाली होती. महिला भगिनींच्या डोक्यावरचा हंडा कायमचा उतरविण्याचा ना. आशुतोष काळे यांनी निश्चय केला होता. त्यासाठी शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवून केलेल्या पाठपुराव्यातून अडीच वर्षात पाणी पुरवठा योजनांसाठी २०० कोटीच्या वर निधी आणून ४० पेक्षा जास्त गावातील महिलांच्या डोक्यावरचा हंडा कायमचा उतरविण्यात ना. आशुतोष काळे यांना यश आले आहे.
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख, वेस. सोयेगाव, धोंडेवाडी, बहादरपूर, अंजनापूर, मनेगाव व राहाता तालुक्यातील वाकडी या आठ गावांचा पाणी प्रश्न कायमचा सुटावा यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. या आठ गावांच्या पाणी पुरवठा योजनांना शासनाकडून जवळपास ६६ कोटी निधी मंजूर करण्यात आला असून या आठही गावातील नागरीकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागला असल्याचे श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील अनेक गावातील नागरिकांना मागील काही वर्षापसून पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत होती. त्याची दखल घेवून ना. आशुतोष काळे यांनी आजपर्यंत अनेक गावातील पाणी पुरवठा योजनांना निधी आणून या गावातील महिलांच्या डोक्यावरचा हंडा कायमचा उतरविला आहे. त्याच बरोबर उर्वरित गावांचा देखील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरूच होता. त्या पाठपुराव्यातून नुकताच मतदार संघातील आठ गावांना तब्बल ६५.९७ कोटी निधी जल जीवन मिशन योजने अंतर्गत पाणी पुरवठा योजनांसाठी मंजूर करण्यात ना. आशुतोष काळे यांना यश मिळाले आहे. यामध्ये रांजणगाव देशमुखसह वेस. सोयेगाव, धोंडेवाडी, बहादरपूर, अंजनापूर, मनेगाव या सात गावांच्या पाणी योजनेसाठी ३५ कोटी ९८ लाख ५५ हजार व राहाता तालुक्यातील वाकडी गावच्या पाणी पुरवठा योजनेसाठी २९ कोटी ९८ लाख ९० हजार असा एकूण ६५ कोटी ९७ लाख ४५ हजार निधी या पाणी पुरवठा योजनांसाठी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांची मागील अनेक वर्षापासूनची पिण्याच्या पाण्याची समस्या मार्गी लागणार आहे.
अजूनही अनेक गावातील पाणी पुरवठा योजनांना निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरूच असून त्यांना देखील लवकरच निधी मिळणार असल्याचे ना. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे. वरील सर्व गावातील नागरिकांनी जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न मार्गी लावल्याबद्दल ना. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.